Skip to main content

पेडलवारी २०२३ - सचिन गुल्हाणे

सायकल वारी -ओढ पांडुरंगाची

खर तर सायकल वारी करण्याची इच्छा बरेच वर्ष होती, २ उद्दिष्ठ होती

  • माऊलीचे एक वेगळ्या प्रकारे दर्शन घेणे 
  • आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनक्रमातून बाहेर पडून काहीतरी वेगळं करणं

बरीच आव्हान आणि समस्या असणार होत्या, राईडच्या अगोदर घरून परवानगी ( खरंच) मिळवणं मोठ आव्हान होत, ऑफिस वेळ सांभाळता मोठया राईड चा सराव झाला नव्हता आणि मुख्य म्हणजे दुपारी उनात राईड करण्याचा सराव अगदीच नव्हता... फक्त एकच जमेची बाजू होती,  माऊलीच्या दर्शनासाठी सायकल ने जाणे ही प्रबळ इच्छाशक्ती . 

सोबतच्या ४ मित्रांना जे नेहमीचे सायकलपटू नाहीत त्यांना पण पटवून राईड ला घेऊन जाणार होतो, त्याच एक वेगळच दडपण होत. निघायच्या २ दिवस आधी त्यातील २ लोकांनी व्ययक्तिक कारणांनी नकार दिला आणि दडपण अजूनच वाढले, श्री आणि सौ राठोड नेहमी प्रमाणे उत्साहात तयार होते.

आधल्या दिवशी बॅग ड्रॉप साठी मी सारंग ला माझे घर सूचित केले होते, बऱ्याच लोकांना ते माहिती असल्यामुळे मदत होईल हा त्यामागचा उद्देश. संध्याकाळचे कॉल्स थोडे उशिरा घेत ४२ बॅग्स जमा केल्या आणि अद्वैत च्या गाडीत व्यवस्थित लावल्या. यात खरा तर अपेक्षेपेक्षा बराच वेळ गेला पण सगळ्यांच्या भेटी झाल्या ही जमेची बाजू

रात्री झोप फार तर १ तास झाली,आणि पहिले रुखमाई चे दर्शन घरीच झाले , बायकोने सकाळी २ ला उठून पोळी रोल बनवून दिला (तिला पण मनातून वाटत असावं की नवऱ्याने पंढरपूर दर्शनाला जावे) .. मग अजूनच एक शक्ती मिळाली की काही झालं तरी राईड पूर्ण करूयात.

सकाळचा टप्पा छान गेला, मीनल, अनंत, विक्रम आणि बाकी काही मंडळी सोबत पाटस पर्यंत ६.१५ ल पोहचलो..छान २ चहा आणि थोडफार खाऊन पुढील वाटचालीसाठी सुरुवात केली. 

खरं तर मला सायकल हाय गिअर वर आणि वेगात चालवायची सवय आहे ( मला माहित आहे ही चांगली सवय नाही) , पण त्यादिवशी मी ठरवून गिअर बदलवत संथपणे राईड करत होतो, बऱ्याच वेळा मनात माऊली चा जपनाम सुरू होता. हळू हळू जस उन्हं चढू लागल , सायकल चालवणे अवघड होत गेलं. ठिकठिकाणी असलेल्या पाण्याच्या थांब्यांमुळे जरा मदत मिळत होती पण पाणी पिऊन २-३ किलोमीटर झाले की परत तहान लागत होती. 

माझी आणि अनंत ची चुकामूक झाल्यामुळे बराच वेळ त्या उन्हात एकटा सायकल चालवत होतो. पाणी संपलं होत आणि प्रचंड भूक लागली होती त्यामुळे पुढे मी डालजला एका मिसळ हॉटेलवर थांबायचं ठरवलं, बराच वेळ एकटा सायकल चालवल्यामुळे कंटाळा आला होता आणि थांबलो तर विशाल अगोदरच हॉटेल मध्ये बसला होता, त्याच्याशी थोड्या गप्पा मारून मनाला बर वाटलं. तो पुढे निघाला आणि मी अनंत आणि बाकी लोकांसाठी थांबायचे ठरवले. 

उन्हामुळे बरीच दमछाक झाली होती , हॉटेल मध्ये बऱ्याच लोकांनी , कुठे जातोय, कश्याला जातोय अश्या चौकश्या केल्या त्यांच्यासोबत गप्पा मारताना वेळ छान गेला. बायकोनी दिलेली पोळी रोल खाल्ला त्यामुळे पोटातले कावळे पण शांत झाले होते. राईड च्या दरम्यान मी खर तर कधी घरी फोन करत नाही, त्या दिवशी आवर्जून फोन केला आणि माझ्या रुख्माई ला धन्यवाद दिले.  

लवकरच अनंत भेटला आणि पुढील प्रवास सुरू झाला. साधारण १३० किलोमीटर झाले असताना अचानक आरतीची हाक ऐकू आली. उन्हाने अंगाची लाही लाही झाली होती आणि आरती रुपी माऊली पाण्याचा पाईप घेऊन उभी होती. तिने छान भिजवल तेव्हा जरा बरं वाटलं. तिथून इंदापूर ल जेवणाचा थांबा पर्यंतचा प्रवास छान झाला. 

साधारण ११.१५ /३० वाजले होते. स्ट्रेचींग करून थोड्या वेळ गप्पा मारून छान जेवण केलं, आणि एक फेरफटका मारला. आता बरीच लोक जेवायला जमा झाली होती, तिथले २ गाववाले बोलत होते, एकानी विचारलं का करत असावेत हे लोक असल काही, दुसरा म्हणाला वेड, अजून काय. मी लगेच म्हटलं, वेड म्हणा की ध्यास, भक्ती की छंद शेवटी माऊली चे दर्शन घ्यायचे हेच उद्दिष्ठ आहे.

आतापर्यंत १४० किलोमीटर अंतर फारसा दम ना लावता २५ पेक्षा जास्त गती ने पूर्ण केलं होत. ज्यांनी अगोदर सायकल वारी केली आहे त्यांनी इंदापूर ते पंढरपूर हे ७० किलोमीटर चे अंतर कस बघणार आहे म्हणून अगोदरच संगितल होत ( की घाबरवल होत 😀) , अजूनही फार तस दमल न्हवतो, सायकल हळू चालवत असल्यामुळे बरीच 

एनर्जी होती पण उन्हामुळे एक थोड दडपण होत, क्रंप आलातर काय म्हणून जरा जपूनच चालवत होतो. इंदापूर ते टेंभुर्णी रस्त्यावर संतोष ची भेट झाली आणि दोघांनीही काही न ठरवता आम्ही  सोबत सायकल चालवत होतो. काही लोक पुढे गेलेत तर काही मागे राहिले होते.  

माझा असा विचार होता की टेंभूर्णी पर्यंत जरा हळूच जावं आणि मग शेवटचे ४० किलोमीटर आपल्या नेहमीच्या शैलीने जोर लावत पूर्ण करायचं. हा थोडासा का  होईना पण गर्वच होता , यात कुठे तरी "मी"पणा होता, आणि ते विठ्ठल रुपी संतोष ने जाणल असावं... त्याने मला आपण आता पुढे Leisurely राईड करू हा सल्ला दिला आणि का माहिती "मी"पणा गळाला आणि मी संतोषला म्हटलं, आपण दोघे आरामात रमत गमत पुढील अंतर पूर्ण करू.

टेंभुर्णी नंतर एक ५-१० किलोमीटर वरच संतोष म्हटला उसाचा रस पिऊ यात, खर तेव्हा गरज नव्हती पण तरी हो म्हटलं.आणि आयुष्यातला सगळ्यात चांगला "बांबू" उसाचा रस प्यालो ( ५०० ml)  ..टेंभुर्णी नंतरचे अंतर खर तर बऱ्याच लोकांना अवघड गेले, पण संतोष  च्या leisurely राईड मुळे म्हणा की विठ्ठलाच्या ओढीने म्हणा मला तस् फार जाणवलं नाही. 

तसं म्हणायला चढाव, उन्हं आणि प्रचंड वारा याचा तर झाला, पण कुठे ही मनात ही शंका आली नाही की आपण राईड पूर्ण करू शकू की नाही. शारीरिक थकवा होता पण मन ताजेतवाने होते. मजल दर मजल करत विठोबाच्या भव्य मूर्तिजवळ पोहचलो, काही फोटो काढून पुढे रस्ता चुकत भक्तंनिवास ला पोहचलो. 

सायकल पॅक करून छान अंघोळ केली, जेवण केलं आणि ज्यासाठी हा  अट्टाहास केला होता त्या विठू-रुख्माई दर्शन घेतलं. रात्री मंदिरातून परत आलो फार दमलो होतो, आणि सायकल लोड करण्याची प्रचंड गर्दी होती, इथे परत सारंग रुपी विठ्ठल भेटला, मला म्हटला जा, मी बघतो तुझी सायकल. वर रूममध्ये जाणार तर, संतोष सायकल लोड करण्यासाठी उभा होता , त्याने आणि श्रीरंग ( विठ्ठल रूप) सायकल लोड केली.

अश्या रीतीने माझे विठ्ठलाचे दर्शन झाले , संध्याकाळी मंदिरात तर झालेच पण दिवसभर वेगवेगळ्या रूपात त्याने भेट दिली.

 म्हणतात ना 

टाळघोष कानी येती
ध्यानी विठ्ठलाची मूर्ती

तसच प्रत्येक पायडल मारताना ध्यानात विठ्ठल होताच ...माऊली माऊली, जय हरी विठ्ठल 🙏🙏

ता. क. सायकल वारी च्या २२० किलोमीटरवर राईड दरम्यान मी सायकल चा २०००० किलोमीटर च टप्पा पण पूर्ण केला, हा दूग्धशर्करा योग आहे.माऊली माऊली 🙏🙏



Comments

Santosh G said…
धन्यवाद. Leisurely

Popular posts from this blog

Photo of the week - 23/Jun/25 - 29/Jun/25

 Theme: Greenery / Monsoon Flowers Special Mentions

Photo of the week - 05/May/25 - 11/May/25

Theme: Monuments, Historical Sites Special Mention