पंढरपूर वारी एक स्वप्नपूर्ती...
अनेक वर्षांपासून पंढरपूरची वारी करायची मनामध्ये इच्छा होती, पण गर्दीमध्ये आणि पायी चालत जमेल अशी शाश्वती वाटत नव्हती. अचानक काही महिन्यांपूर्वी पेडलवाली या सायकलिंग ग्रुपमध्ये सायकलवर वारी करता येते ही संकल्पना समजली. फेब्रुवारीमध्ये याचे रजिस्ट्रेशन ओपन झालं आणि मी उत्साहाच्या भरात पटकन रजिस्टर करून टाकलं.
मग सुरू झाली तयारी.. चार महिन्यांमध्ये पेडलवालीच्या लीडर्सनी दहा वेगवेगळ्या अंतराच्या, वेगवेगळ्या आवाक्याच्या आणि वेगवेगळ्या मार्गांवरच्या राईड्सचे अतिशय सुंदर नियोजन केलं होतं. परंतु प्रॅक्टिससाठी मुख्य अडथळा हा उन्हाळ्याच्या सिझनचा होता.
उन्हाळ्यामध्ये प्रॅक्टिस राईट्स करणं खूप अवघड होतं. 40 डिग्री सेल्सिअसमध्ये आम्ही दुपारी बारा कधी कधी एक दोन वाजेपर्यंत राईड संपवून परत यायचो तेव्हा अंग भाजून निघालेलं असायचं. मनामध्ये कधी कधी प्रश्न यायचा कशासाठी हे सगळं करतोय, मग कुठून तरी आत माऊली माऊली अशी साद यायची... आधी वारी केलेल्यांचे अनुभव उत्साह वाढवायचे, सातत्याने प्रॅक्टिस, प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस... एकच टार्गेट पंढरपूरची वारी यावर्षी करायचीच.
दहा पैकी सात राईड पूर्ण केल्या आणि म्हणता म्हणता 10 जून हा वारीचा दिवस येऊन ठेपला. उन्हाळा म्हणावा तितका कमी झालेला नव्हता पावसाने दडी मारलेली होती, त्यामुळे अपेक्षेप्रमाणे ढगाळ वातावरणात वारी होईल असं दिसत नव्हतं. दहा तारखेला पहाटे तीन वाजता कोथरूड होऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून वारी निघणार होती.
नेहमीप्रमाणे आदल्या रात्री झोप नीट लागलीच नाही. गाढ झोप लागायला साडेबारा वाजले आणि दोन वाजता अलार्म न वाजता जाग आली. उठल्यानंतर सुद्धा कुठेही झोप न झाल्याचा लवलेशही वाटत नव्हता, इतका उत्साह अंगात संचारला होता.
सकाळी आठ वाजेपर्यंत 80 किलोमीटर अंतर कापून झालं होतं, पण आठ वाजल्यापासूनच सूर्यनारायण तळपायला लागला आणि आजचा दिवस परीक्षेचा ठरणार हे जाणवायला लागलं. शंभर किलोमीटर होईपर्यंत सूर्य चांगलाच वर आला होता पण उत्साहाचे उधाण तेवढंच होतं.
जेवणाच्या पॉईंटला पोहोचलो तेव्हा दीडशे किलोमीटर पूर्ण झाले होते आणि दुपारचे बारा वाजले होते. दीडशे किलोमीटर सायकलिंग करूनही कुठेही फारसा थकवा जाणत नव्हता हा सगळा प्रॅक्टिस, बरोबरच्या लोकांचे प्रोत्साहन आणि पांडुरंगाचे बोलावणे याचाच परिणाम आहे असं जाणवत होतं.
जेवणानंतर राईड सुरू केली आणि मग मात्र ऊन इतकं तापत गेलं की डोक्यावर ओला रुमाल बांधून चालवत राहिलं, तर पंधराव्या मिनिटाला रुमाल वाळून जायचा. साधारण 160 किलोमीटर झाल्यावर मात्र ऊन सहन होईनासं झालं आणि मग ठरवलं की आता बास....बचेंगे तो अगली बार फिर आएंगे...
त्या पुढचं अंतर मात्र सायकल टेम्पोत टाकून, शांतपणे गाडीत बसून पूर्ण केलं. पोहोचायला संध्याकाळचे साडेसात वाजले. परंतु गेल्यावर विशेष थकवा जाणवला नाही.
रात्री दहा वाजता दर्शनाला गेलो, पांडुरंगाचे मुखदर्शन छान झाले, परंतु सगळ्यांनी जे सांगितलं होतं की तिथे गेल्यावर वेगळीच अनुभूती येते, तसं काही जाणवलं नाही किंवा पांडुरंगाचे दर्शन घेतल्यामुळेही फार काही वेगळं जाणवलं नाही, असं वाटत होतं की हा तर गेले चार महिने माझ्याबरोबरच होता.
त्यामुळे मूर्तीत मला देव दिसला नाही.. पण मला देव दिसला सगळ्या आयोजकांमध्ये, सगळ्या टीम लीडर्स मध्ये, सगळ्या को-रायडर्समध्ये, आम्हाला जागोजागी हायड्रेशन पुरवणाऱ्या स्वयंसेवकांमध्ये... निस्वार्थ बुद्धीने अनेक दिवस आयोजन करत असलेल्या सर्वांमध्ये...
म्हणतात ना भाव तिथे देव... वारी ही केवळ पांडुरंगाच्या दर्शनासाठी नव्हती... तर हा प्रवास होता आत्म संवादाचा... आत्म शोधाचा...
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏


Comments