तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल...
मला विठ्ठल भेटला...?
मागच्या वर्षी अमोल (माझा मेहुणा) सायकल वारीला जाऊन आल्यापासून आपण पण करावी ही वारी अस खूप डोक्यात होत. "गेट वे ऑफ इंडिया" राईड मधल्या भारी यशस्वी राईड नंतर स्वतः बद्दल आत्मविश्वास चांगलाच वाढला होता त्यामुळे वारीचा मेसेज आल्या आल्या लगेच बुकिंग उरकून टाकलं. ग्रुपच्या प्रॅक्टिस राईडस मधे पण भाग घ्यायचा ठरवल, पहिला श्रीगणेशा ची थेऊर राईड केली सुध्दा पण नंतर अनेक कारणांमुळे एक पण राईडला जायला जमलं नाही. स्वतःहून दोन ३० आणि ५० किमीच्या राईड केल्या, पण २३०+ किमी आपल्या ला जमेल का या विचाराने मन अस्वस्थ झालं... त्यात मे पासून कुटुंबा बरोबर सहल, ऑफिस च काम असा सारखा प्रवास झाल्यामुळे उष्णता आणि पित्ताचा चांगलाच त्रास झाला होता.
ग्रुपच्या शेवटच्या तयारी मीटिंग मधे सांगितलं होतच की त्रास व्हायला लागला तर बिनधास्त ट्रकमध्ये बसा...पण साला हार मानायची सवयच नाही ना आणि नेमकं याच गोष्टीचा त्रास पण होतो कधी कधी.
सर्व तयारी करून छान झोप घेवून सकाळी मस्त पहाटे ३ ला निघालो. कात्रज ते हडपसर प्रवास झाला आणि हडपसरला बाकीचे सगळे भेटले आणि खरी रपेट सुरू झाली. व्यवस्थित स्ट्रेचिंग झालं नाही का काय माहित पण उजवा पाय जरा त्रास देवू लागला, जून दुखणं तोंड वर काढू लागलं. कळ अगदी तळव्यापासून कमरेपर्यंत जाऊ लागली. पण आमचे २ विठ्ठल, अनंत आणि प्रसाद दादा जोरात चिअर अप करत पहिल्या थांब्या पर्यंत घेवून पण गेले. तिथे सर्वांनी मस्त खाल्लं चहा प्यायला आणि पूर्ण ग्रुपची एकंदर ऊर्जा मिळाली. तिथून पुढे निघाल्यावर मात्र संध्याकाळपर्यंत ती पायातून येणारी कळ कुठे गायब झाली माहीत नाही.
तरी पण मनात कुठे तरी सारखी भीती होती त्यामुळे ठरवल की कमीत कमी वेळा थांबायचं आणि उन्ह वाढायच्या आत जास्ती जास्त अंतर कापायचं.
या प्रवासात भूक काय असते हे मात्र चांगलंच जाणवलं. दररोजच चौकटीतल जीवन जगत घड्याळाच्या काटयावर जेवणाची एवढी सवय झालिये की भूक कशी असते हेच विसरून गेलो आहे. बघता बघता भिगवन गाठलं पण , पुढे चढ उतार पार करता करता जबरदस्त भूक लागली, थोड पाणी प्यायल आणि सुंदर निळभोर आभाळ बघत बघत अजुन थोड अंतर तोडल. आता थोड थांबुयात ठरवून एक छोटं टपरी वजा हॉटेल बघितलं आणि डबा काढला, पोळीचे रोल खायला लागलो. त्याक्षणी त्या पोळीमध्ये मला विठ्ठल दिसला..
अमृताला म्हणालो होतो नको एवढ्या लवकर उठू पोळ्या करायला तरी पण बिचारीने सकाळी पहाटे २ वाजता उठून पोळ्या करून दिल्या होत्या.. तिच्या त्या काळजी मधे मला विठूमाई दिसली...
तेवढ्यात अचानक ओळखीची जर्सी दिसली आणि हात केला , सचिन होता तो . मस्त दोघांनी गप्पा मारत पोळ्या खाल्ल्या, एकमेकांना थोडी ऊर्जा देवून पुढे प्रवास सुरू केला... जोरात पुढे आल्यामुळे एकट वाटायला लागलं होत पण सचिन भेटला आणि मला त्याच्यातपण विठ्ठल दिसला.
आता ओढ लागली होती इंदापूर ची कारण तिथपर्यंत पोहोचलो की मोठी विश्रांती मिळणार होती आणि खूप अंतर कापल्याचा आनंद पण. त्यामुळे पेडल अजुन जोरात फिरायला लागली...
पाटस ते इंदापूर हा प्रवास चांगला कस लावणारा आहे असं ग्रुप मधील मंडळीन कडून ऐकलं होत. नुसते चढ उतार आणि निमुळता रस्ता त्यामुळे गाड्या खूप जवळून जात होत्या आणि त्यांच्या वाऱ्याच्या झोताने सायकल वाकडी तिकडी खेचली जात होती.
काहीच वेळात जवळच पूर्ण पाणी संपलं, पोटातल्या पोळ्या संपल्या आणि भूक आणि तहान जाणवायला लागली... फार फार तर ९.३० वाजले होते पण उन्ह चांगलीच लागायला लागली होती. एक मोठा चढ पार केला आणि आपली माणस दिसली... सारंग दादाने हात दाखवला आणि थांबलो. गार पाणी आणि केळ खायला मिळालं. तळपत्या उन्हामुळे डोळे जरा धुंद झाले होते. त्या छोट्या विश्रांती मुळे बरं वाटलं. तिथे मला सारंग आणि आरती मधे विठुराया दिसला.
पुन्हा एकदा चाके फिरायला लागली, थोड्या वेळात एकदाचा तो इंदापूर फाटा दिसला आणि लगेच माऊली, म्हणजे जेवणाचे हॉटेल. आत गेल्या गेल्या आमचे दोन वीर दिसले विक्रम आणि निखिल. तिघांच्या ही चेहेऱ्यावर तोच आनंद तेच समाधान... मस्त गप्पा झाल्या पुढे काय आणि कसं जावं ठरवल आणि मस्त जेवण केलं. नक्कीच या दोघांमध्ये ही मला विठोबा दिसला.
आता पुढे टेंभुर्णी आणि पंढरपूर फाटा , त्यानंतर एकदम मस्त झाडी आणि एकेरी रस्ता असं काहीस कानावर पडलं होत. सकाळपासून नुसता हम रस्ता आणि मोठी वाहने याचा कंटाळा आला होता त्यामुळे कधी एकदा पंढरपूर रस्त्याला लागतोय अस झाल होत पण ते एवढ्या लवकर होईल असं काही दिसत नव्हतं.
हॉटेल वरून निघालो तेव्हा माझ्या पुढे विक्रम आणि निखिल निघाले होते, थांबावं की जाव असा प्रश्न पडला होता पण निघालो. कारण शरीराला फार आराम दिला की हळू हळू एक एक अवयव बोलायला लागतील म्हणून पुन्हा एकदा पेडल वारी सुरू झाली. निघता निघता सारंग दादा म्हणाला चला आम्ही येतो पाणी घेवून. या पूर्ण वारी मधे मला रस्ता वर एकटा आहे असं कधी वाटलं नाही. कारण एवढी सगळी विठ्ठलाची रुपं होती पाठीशी.
जेवल्यामुळे शरीर थोड थकलं होत पण थांबणे हा पर्याय नव्हता. तासभर प्रवास झाला आणि पुढे एका झाडाच्या मस्त सावली मधे सारंग आणि आरती पाणी घेवून थांबलेले दिसले. पाणी प्यायल, डोक्याचं कापड भिजवून घेतलं आणि पुन्हा निघालो तेवढ्यात आरती ने विचारलं सगळं व्यवस्थित आहे ना...
तेव्हा मला तिच्यामध्ये विठूमाई दिसली.
पुन्हा एकदा चाके फिरू लागली आणि एकदाचा तो पंढरपूर फाटा दिसला. पुला खाली उभ राहून पाणी प्यायल तेवढ्यात पुढे आलेले विक्रम आणि निखिल दिसले. निखिल कडून थंड पाणी मिळाले. त्यांची विश्रांती घेवून झाली होती , निघता निघता त्यांनी सांगितलं की उसाचा रस पी मस्त आहे एकदम. तहानलेल्या घशाला आणि दमलेल्या शरीराला त्या थंड गार रसामुळे एवढी ताकत मिळाली की बासच. त्या दोन ग्लास रसामुळे पुढचे २० किमी एकदम जोमात गेले.
पंढरपूर ४० किमी पाटी दिसली आणि जीव भांड्यात पडला. आनंदाने पुन्हा एकदा प्रवास सुरू केला. आता मात्र सूर्य जोरदार तळपत होता, पाय अगदी करपत होते. रस्त्यावरचं डांबर पाघळलेलं होत त्यामुळे सायकलच्या टायर ची काळजी वाटायला लागली. आता परिस्थिती अशी होती की पुढचे पुढे गेले होते आणि मागचे अजुन जवळ आलेले नव्हते त्यामुळे जर का सायकल पंक्चर झाली तर अवघड काम होणार होते. त्यात अजुन एक गोष्ट लक्षात आली की रस्त्याच्या बाजुला बऱ्यापैकी बाबळीची झाडे आहेत... मनातल्या मनात म्हणालो विठ्ठला अता तूच ठरव, इथपर्यंत तर आलो आहे.
पहिले १०/१२ किलोमीटर गेले लगेच पण त्यानंतर चांगलाच बिकट प्रवास सुरू झाला. एक एक किलोमीटर अवघड वाटू लागला. जवळचे पाणी संपत आले होते आणि उन्ह तर भयानक लागत होते. दोन किलोमीटरच्या दगडांमध्ये ९ दगड असतात हे काल कळले. साधारण प्रत्येक ६/७ किमी ला थांबून विश्रांती घेत होतो. खरं तर शरीर दमलं नव्हतं पण मन आता साथ सोडायला लागलं होत, एकट एकट वाटायला लागलं होत. आधार एकच होता की अधून मधून गावा मधली लहान मूल हसत हात करून धैर्य वाढवत होती. तेवढ्यात ओळखीची जर्सी दिसली, तो निवांत एका झाडाखाली सावलीला बसला होता. एकमेकांना हात दाखवले , हसलो आणि विश्रांतीला थांबलो. साधारण ३० किमी राहिले होते पण दोघेही पूर्णपणे थकलो होतो. तोही एकटा आणि मीही. ज्या छोट्या टपरी पुढे बसलो होतो ती बंद होती पण अचानक माणूस आला आणि त्याने दार उघडले. मस्त गार पाणी प्यायला मिळाले. आम्ही दोघे तिथून पुढे एकमेकांना साथ देत चालायला लागलो. तो कोण होता माहीत नाही, आणि विशेष म्हणजे आम्ही एकमेकांना नाव पण विचारले नाही. आम्हाला जोडणारी होती ती फक्त एक जर्सी... सायकल वारीची...
सायकल खूप जपून चालवायला लागत होती कारण अरुंद रस्ता, जोरात वारा आणि मोठ्या गाड्या. सूर्य त्याचे रुद्र रूप दाखवत होता आणि वारा त्याला साथ देत होता. बहुतेक दोघंपण आम्ही कधी तुटतो याची वाट बघत होते. पण विठुराया आमच्या पाठीशी उभा होता. एक मस्त उसाचे शेत आणि त्याला पाणी द्यायला सुरू केलेली टि (पाण्याची मोठी नळी जी जोरात पाणी वर टाकत असते) दिसली. पटकन सायकल बाजूला लावली आणि मस्त हात पाय धुवून गार पाणी प्यायलो. एका मिनिटात ३० वर्षे मागे जाऊन आलो. उन्हाळ्याच्या सुट्टीत आत्त्या, मामा कडे गावी गेल्यावर अश्याच टी वर अंघोळ करायचो. जर्सी मित्र मागून आलाच होता, तो थांबायला नको म्हणत होता पण तरी पण थांबला. पाणी पाहून तो पण खूप खुश झाला...
जेव्हा आपण पूर्ण पणे खचलेले असतो तेव्हा आपल्यामागे तो एक हात असतो, आशीर्वाद असतो. आपण फक्त विश्वास ठेवायचा असतो. पांडुरंग हरी... वासुदेव हरी...
पंढरी आता फक्त ७ किमी लांब होती. सायकल जोमाने पळू लागली, बघता बघता पंढरी दिसायला लागली. एकदाची चंद्रभागा दिसली आणि सकाळी पहाटे ३ वाजल्यापासून सुरू केलेली रपेट पूर्ण झाली. आता भक्त निवास पर्यंत पोहोचू किंवा नाही याची काही काळजी नव्हती.
चंद्रभगेच्या पुलावर थांबलो, मस्त पाणी भरले आहे. पूल ओलांडून त्या पुण्यनगरी मधे प्रवेश केला आणि हळू हळू भक्त निवासला पोहोचलो. आता शरीर नक्कीच थकले होते पण मन आनंदात उड्या मारत होते. कारण खरंच एक मोठा आणि अवघड वाटणारा प्रवास विठुरायाच्या आशीर्वादाने पूर्ण झाला होता. पूर्ण २३० किमी मधे काही त्रास झाला नाही आणि सायकल ने पण पूर्णपणे साथ दिली. आत्ता हवी होती ती पाठ टेकायला एक जागा, नक्की कुठे जायचं आहे हे शोधत होतो, तेवढ्यात ओळखीच्या जर्सी दिसल्या, त्यातल्या एकाला रूम बद्दल विचारलं, त्याने मला नाव विचारलं आणि तो म्हणाला अरे ही तर आपली माणसं..... तो होता आमचा राहुल, पुन्हा एकदा मला त्याच्याकडे विठुराया दिसला...
संध्याकाळी एक एक जण येत होता, लोक नखशिखांत दमलेले होते. अनंत, प्रसाद दादा आणि निखिल स्वतः एवढे दमले होते तरी प्रत्येक दमलेल्याला विश्रांती करायला पाठवून त्यांची सायकल बांधायला घेत होते. त्यांच्या या आपल्या माणसाच्या काळजीत मला विठुराया दिसला.
असं म्हणतात की खरा वारकरी पंढरीत पोहोचल्यावर फक्त विठोबाच्या कळसाला नमस्कार करतो आणि वारी संपतो. काहीसा असाच अनुभव मला आला, देवळा भोवती फिरताना आणि लांबूनच देवाचे मुख दर्शन घेताना मन अगदी भारावून गेल होत. वारी हा एक प्रवास आहे. आमच्या जर्सी वर लिहिलंच आहे, प्रवास आत्म संवादाचा...
सर्वांना रूम मिळाल्यात का, सर्वजण जेवले का, सर्वांच्या सायकल व्यवस्थित गाडीत भरल्या का हे सगळं रात्री उशिरापर्यंत काळजीने करणाऱ्या प्रत्येकात मला विठुराया दिसला.
मी घरी कधी येतोय म्हणून वाट पाहणाऱ्या... आल्यावर हाता पायाला तेल लावून चोळून देणाऱ्या छोट्या मल्हारमधे ही मला विठुराया दिसला...
वारी खूप वर्षे बघतो आहे पण प्रत्येकाची वेळ यावी लागते. काल आईला पोहोचलो म्हणून फोन केला तेव्हा ती ही ध्यन झाली. म्हणाली आजोबांनी ३० पेक्ष्या जास्त वर्षे सायकल आणि पायी वारी केली. त्यानंतर तूच केलीस... वेळ आली की तो बोलवतो आपोआप...
विठोबा निर्गुण आहे. तो प्रत्येकामध्ये आहे. प्रत्येकाबद्दल वाटणाऱ्या काळजीमध्ये, आपुलकीमधे आहे...
ही अशी पेडलवाली माईची सायकल वारी अशीच चालू राहो...
.jpeg)



Comments