Skip to main content

पेडलवारी २०२३ - वारीतले भारी लोक - ६ - सात वीरांचा सफरनामा

आता जे आपण वाचणार आहोत ते अतिशय उत्कृष्ट, प्रेरणादायी, कणखर, आणि तेजस्वी लोकांबद्दल.. नाही नाही , 

हे साधे cyclist वीर नाहीत, तर

वेडात मराठे वीर दौडले सात..

अगदी शिवाजी महाराजांच्या काळात घेऊन जाणारा चित्त थरारक असा प्रवास , एकाचा नाही , दोघांचा नाही ... अहो हा आहे ७ वीरांचा सफरनामा...

ह्या वर्षीच्या पुणे पंढरपूर वारीतल्या ह्या ७ मावळ्यांचा..

ह्यांचा पुढारी एक असा कर्ता पुरुष आहे, ज्याला पाहिल्यावर सगळ्यांच्या ओठावर हसू उमलणार, आणि हृदयात प्रेम दाटून येणार.. 

आता पर्यंत आपणास कल्पना आली असेल मी कोण बद्दल बोलत आहे ..

हो, आपले सर्वांचे लाडके राजीव दादा and team चे मनोगत... 

चला तर या वीरांचा प्रवास पाहूया...

राजीव, जयंत, ऋषिकेश,विवेक, मोहन, नितीन आणि पंकज..

ह्यांनी २४ तासाच्या आत ४६० kms चा प्रवास केला आहे,

तर चला वाचूया


राजीव (कॅप्टन / सर्वांचा दादा / माऊली) 

मनाली-लेह-खारडुंगला, हरिहरेश्वर-गुहागर, पुणे-गोवा (महामार्गाने तसेच कोकणमार्गे), पुणे-तारकर्ली, पुणे-मुंबई, आंबेनळी घाट, लवासा, सिंहगड सारखे तीव्र चढ असणारे ट्रॅक, पुण्याच्या आसपास असलेले बरेच घाट, धरण आणि परिसर इ. अशा अनेक राईडस चा दांडगा अनुभव आहेच. अशा अनेक मोहीमा कधी एकट्याने तर कधी त्यांच्या लाडक्या ग्रुप बरोबर करणारे राजीव हे सर्वांना चांगलेच परिचित आहेत.

कणखर शरीर, तितकेच हळवे मन, इतरांबद्दल अत्यंत आपुलकी असणारे, संकटकाळी मित्रांच्या मदतीस धावून जाणारे, कठीण परिस्थितीत खंबीरपणे पाठीशी उभे असणारे आणि प्रसंगी चूक असल्यास निदर्शनास आणून देणारे म्हणून आम्ही त्यांना प्रेमाने माऊली म्हणतो. आपणच नव्हे तर आपल्याबरोबरील प्रत्येक रायडरला कुठलीही राईड पूर्ण करण्यास प्रोत्साहन व वेळोवेळी आधार देत त्यांनी आपल्या नेतृत्वगुणाचे यशस्वी उदाहरण दिले आहे. वयाच्या ५४ व्या वर्षी राईड करताना फोटो/व्हिडिओ काढून त्याचा सुंदर इंस्टाशॉट रील बनवण्याचा उत्साह हा वाखाणण्यासारखा आहे.

गेल्या वेळी राजीव आणि  जयंत यांनी पुणे ते पंढरपूर सायकल वारी यशस्वीरीत्या पूर्ण केली होती. त्यामुळे त्यांनी ह्यावेळी पुणे - पंढरपूर - पुणे असे (२-way) करायचे ठरवले. गेल्या वेळचा अनुभव गाठीशी होता. पेडलवाली ग्रुपने खूपच पद्धतशीर सराव राईडचे नियोजन केले होते. त्यात पुणे - वीरधरण सातारा, पुणे - भुलेश्वर , पुणे - यवत (नाईट राईड) इ. राईडचा समावेश होता. एरवी अधूनमधून तळजाई देवी मंदिराची राईड सुद्धा होत होती, त्यामुळे तयारी व्यवस्थित झाली होती.

अखेरीस वारीचा दिवस उजाडला. उन्हाचा त्रास टाळावा यासाठी रात्रीच वारी राईड सुरु करायचे ठरवले .

हनुमंताने केला पूल , सगळे धोंडे गेले खोल।
परंतु तेही आले वर, जेव्हा त्यांच्या लिहिले वर।
राम राम राम !! गणपती बाप्पा मोरया !!

ह्यानंतर परंपरेनंतर आम्ही घरच्यांचा निरोप घेतला. सारसबागेला जाऊन गणरायाचे दर्शन घेतले आणि राईडला सुरुवात केली. 

आमची पंढरपूर वारी

आम्ही सर्व (राजीव , जयंत , ऋषिकेश , विवेक , मोहन , नितीन आणि पंकज) जोशात निघालो आणि म्हणता म्हणता दोन-सव्वादोन  तासात यवत ला पोहोचलो सुद्धा. तिथे अमृततुल्य चहा घेऊन ताजेतवाने झालो आणि पुढे निघालो. मग अडीच वाजता कुरकुंभ आणि ४ वाजता भिगवणला पोहोचलो. साधारणपणे ६ तासात १०० किमी पार पडले. ७ वाजता इंदापूरला  भरपूर नाश्ता केला आणि १०.३० ला टेम्भूर्णी ला पोहोचलो.

वाटेत आमच्यापैकी एका सायकलीचे दोन टायरला तीन वेळा पंक्चर झाले. आज विठूमाऊलीने आमची / आमच्या ग्रुप ची परीक्षा घ्यायची ठरवली होती. पण राजीव सोबतीला असल्याने आम्हाला कसलीच काळजी नव्हती. पंक्चर काढल्यावर उसाचा ताजा व थंड रस घेऊन आम्ही पुढे निघालो. पुढील टप्पा ४० किमीचा, मात्र रस्ता रखरखीत. बरेच अंतर कापल्यावर एखादे झाड दृष्टीस पडे . थोडे पाणी आणि विश्रांती घेतली की पुढे निघत असू.  अखेरीस विठुरायाची विलोभनीय मूर्ती दिसली आणि तेथे जरा वेळ थांबलो.

सुंदर ते ध्यान , उभे विटेवरी ।
कर कटावरी, ठेवोनिया ।।

मग थोड्या वेळाने आम्ही सर्व जण श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासला पोहोचलो.

सायंकाळी आंघोळी आटोपून मंदिरात गेलो.  ज्या क्षणाची गेले काही आठवडे आतुरतेने वाट पाहत होतो, तो क्षण अखेरीस आला. मन भरून श्री विठ्ठल आणि रखुमाईचे दर्शन घेतले आणि भक्त निवासात परतलो. वारकरी दरवर्षी पंढरपुरी का येतो याचा प्रत्यय आला आणि आम्ही मनोमन ठरवले आता दर वर्षी आपणही सायकल वारी करायची. 

संध्याकाळी जेवण आणि थोडी झोप घेऊन आमच्यापैकी तिघे परतीच्या प्रवासाला (सायकलवर) निघालो. जाताना जेवढा जास्त  आल्हाददायक अनुभव होता, तेवढा खडतर येतानाचा अनुभव होता. सलग दोन रात्री केवळ १-२ तास झोप काढून २२०+ किमी अंतर गाठायचे म्हणजे शारीरीक व मानसिक कसोटीच. मग अधून मधून चहा आणि थोडे खायला थांबलो, की राजीव व जयंतकडून जरा प्रोत्साहन मिळे. ताजेतवाने झालो की मग लगेच राईड सुरु.

येतानाचा प्रवास हा खऱ्या अर्थाने आत्मसंवाद होता. मात्र मनात एक नक्की ठरवले होते कि जिथे शक्य होईल तिथे फोटो अथवा विडिओ घ्यायचा. आमचा एक मित्र रुपेश त्याच्या मुलासोबत आम्हाला पुण्याहून भिगवणला भेटायला आला. त्याने आम्हाला तिथे थोडे खायला दिले  आणि लिंबू सरबतसुद्धा दिले. ह्यामुळे आम्ही अक्षरशः भारावून गेलो. यवतला जेवण आटोपले. शेवटचा ५० किमीचा पार करण्यात रहदारी वगळता फार अडचण आली नाही आणि सुखरूप फातिमानगर चौकात पोहोचलो. इतर मित्रांना भेटून सर्व थकवा गेला होता. सायंकाळी  घरी पोहोचलो आणि राहुलने आणलेला सुरेख केक कापून वारीची सांगता केली.

२ दिवसां पेक्षाही कमी वेळात जवळपास ४६० किमीहून अधिक अंतर कापले होते.

वारीपूर्वी सराव राईड, टी-शर्ट / बिब वाटप, आणि वारीच्या वेळी पेडलवाली टीमने ठिकठिकाणी पाणी पुरवण्यास Hydration पॉईंट्स, गरज पडल्यास सायकल दुरुस्तीला मदत, नाश्ता / जेवणाची / राहण्याची सोय इ. चे व्यवस्थित नियोजन केले होते.

आमच्या या यशस्वी वारीत पेडलवाली टीम आणि इतर आयोजकांचा सिंहाचा वाटा आहे ह्यात काहीच शंका नाही. 

Comments

Akash Khot said…
काही माणसं किती ग्रेट असतात हे त्यांच्या तोंडून समजत नाही, आणि त्यांची वागणूक इतकी आपुलकीची असते की आपल्यासारखेच साधे वाटतात पण त्यांच्यासोबत राहून त्या ग्रेटनेसबद्दल समजायला लागतं..

राजीव दादा असाच आहे, एका शब्दाने काय काय पराक्रम केलेत त्याबद्दल शो ऑफ करत नाही, काही बोलण्याच्या ओघात आलेल्या गोष्टी समजत जातात तेवढंच

आणि कोरायडर्सबद्दल एवढी आपुलकी की ते त्याचे घनिष्ट मित्र असोत की सोबत पहिल्यांदा आलेले रायडर्स असोत, तो तेवढीच काळजी घेतो..

मागच्या वर्षीच्या वारीच्या सरावात आम्ही सिंहगडला गेलो होतो, जाताना मी राजीव दादा आणि जयंत दादा तिघेच पुढे होतो..

घाट सुरू होतो तिथे आम्ही मागच्यांसाठी काही वेळ थांबलो, पहिल्यांदाच असा घाट चढणार असल्यामुळे मला वेळ लागेल असा अंदाज होताच, मी त्यांना म्हणालो मी हळू हळू जातो पुढे आणि निघालो

दम लागल्यामुळे थांबत थांबत चाललो होतो आणि काही वेळाने हे दोघं सराईतपणे क्रॉस करून गेले वर

त्या दिवशी मी कितीवेळा थांबलो असेल काही गिनतीच नाही 😃 बाकी बऱ्याच जणांची तीच गत होती.

वर धापा टाकत पोचलो तेव्हा ह्यांचा नाश्ता सुरू झाला होता..

मी म्हटलं दिसलाच नाहीत नंतर कुठे, किती वेळ झाला पोहचून..

दादा शांतपणे सांगतो अर्धा पाऊण तास झाला अरे, नॉन स्टॉप आलो वर 😱

मी अवाक् झालो.. म्हटलं आपल्याला stamina बनवायचा तर तो असा. दीर्घ काळ फिट राहायचं तर ते असं. 🙏🏼

मागच्या पंढरपूर वारीत आम्ही काही जण मागे राहिलो होतो आणि त्यापैकी काही जणांच्या सायकल पंक्चर, उन्हाचा त्रास, पाठदुखी अशा समस्यांमुळे उशीर होत गेला होता

दुसऱ्या दिवशी राजीव दादा भेटला आणि त्याला आदल्या दिवशीचे किस्से समजले की म्हणाला अरे काय आकाश, असं झालं की फोन करायचा असतास, रस्त्यात थांबलो असतो

फुल सपोर्ट राईड होती, तरी खरंच त्याला फोन केला असता तर थांबला असता तो. 😊

राईड मध्ये त्याची उपस्थितीच अगदी आश्वासक असते, आणि त्याच्या नियोजनातही त्याचा सहभाग असेल तर त्यातल्या बारीक सारीक गोष्टींकडे किती त्याचं लक्ष असतं हे सुद्धा पाहण्यासारखं असतं.

असो, सांगण्यासारखं बरंच असतं आणि यापुढेही बरंच सापडेल याची खात्री आहे.

त्याच्या सायकलिंगमधल्या काही भारी राईड्स आणि किस्स्यांवर सारंग सरांनीसुद्धा मागे लिहिलं होतंच.

त्यामुळे इथेच थांबतो.

Salute to the captain and his crew 🫡😊

Popular posts from this blog

Photo of the week - 23/Jun/25 - 29/Jun/25

 Theme: Greenery / Monsoon Flowers Special Mentions

पेडलवारी २०२३ - सचिन गुल्हाणे

सायकल वारी -ओढ पांडुरंगाची खर तर सायकल वारी करण्याची इच्छा बरेच वर्ष होती, २ उद्दिष्ठ होती माऊलीचे एक वेगळ्या प्रकारे दर्शन घेणे  आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनक्रमातून बाहेर पडून काहीतरी वेगळं करणं बरीच आव्हान आणि समस्या असणार होत्या, राईडच्या अगोदर घरून परवानगी ( खरंच) मिळवणं मोठ आव्हान होत, ऑफिस वेळ सांभाळता मोठया राईड चा सराव झाला नव्हता आणि मुख्य म्हणजे दुपारी उनात राईड करण्याचा सराव अगदीच नव्हता... फक्त एकच जमेची बाजू होती,  माऊलीच्या दर्शनासाठी सायकल ने जाणे ही प्रबळ इच्छाशक्ती .  सोबतच्या ४ मित्रांना जे नेहमीचे सायकलपटू नाहीत त्यांना पण पटवून राईड ला घेऊन जाणार होतो, त्याच एक वेगळच दडपण होत. निघायच्या २ दिवस आधी त्यातील २ लोकांनी व्ययक्तिक कारणांनी नकार दिला आणि दडपण अजूनच वाढले, श्री आणि सौ राठोड नेहमी प्रमाणे उत्साहात तयार होते. आधल्या दिवशी बॅग ड्रॉप साठी मी सारंग ला माझे घर सूचित केले होते, बऱ्याच लोकांना ते माहिती असल्यामुळे मदत होईल हा त्यामागचा उद्देश. संध्याकाळचे कॉल्स थोडे उशिरा घेत ४२ बॅग्स जमा केल्या आणि अद्वैत च्या गाडीत व्यवस्थित लावल्या. यात खरा तर अपेक...

Photo of the week - 05/May/25 - 11/May/25

Theme: Monuments, Historical Sites Special Mention